....
उडीद, मुगाचे उत्पादन घटणार
अंबाजोगाई : चार दिवसांत झालेल्या पावसाने मूग, उडीद पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांंना बसणार आहे. परिणामी मूग, उडीद पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. तरी शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
....
नियमबाह्य बांधकामाचा व्यापाऱ्यांना फटका
माजलगाव : शहरात अनेक ठिकाणी नियमबाह्य कॉम्प्लेक्स बांधून अनेक ठिकाणी अंडरग्राउंड दुकाने काढून त्यांची विक्री केली, तर काही जागा भाड्याने दिल्या होत्या. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अंडरग्राउंड असलेल्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कॉम्प्लेक्स करताना खाली अंडरग्राउंड जागेवर पार्किंग करणे आवश्यक होते; परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून नगरपालिकेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून पार्किंग करण्याऐवजी त्या ठिकाणी दुकाने काढल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
....
साबलखेड-आष्टी रस्त्यावर खड्डे खड्डेच
कडा : आष्टी तालुक्यातील साबलखेड-आष्टी या १५ किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डेच पडले आहेत. पावसाने हा रस्ता पार उखडून गेला असून, काही ठिकाणी तर चक्क रस्ताच वाहून गेला आहे. साबलखेडनजीक पुलावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे पूल खचण्याची भीती आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी स्वाभिमानी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता दिलीप तारडे यांना विचारणा केली असता त्यांनी या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.