कडा - रात्रीच्या अंधारात अन्न शोधताना ससा ४० फुट खोल विहीरीत पडला. त्या सश्याचे प्राण वाचवण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. तरुणाने दोरीच्या सहाय्याने विहीरीत उतरुन सश्याला सुखरुप बाहेर काढले. त्या तरुणाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील कडा येथील किशोर भंडारी यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच दिवसापासून एक जंगली ससा पडला होता. त्यांनी सश्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही. मग या घटनेची माहिती प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना मिळाली. ते राजेंद्र घोडके यांना घेऊन त्या ठिकाणी गेले. विहिरीत पडलेला ससा कपारीच्या आडोशाला उपाशी पोटी व्याकूळ होऊन बसलेला दिसला. हे पाहताच नितीन आळकुटे हे दोरीच्या सहाय्याने खाली उतरले आणि त्याला सुखरूप बाहेर काढले.