लोकमतच्या वृत्ताची गंभीर दखललोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक रुग्णांशी संवाद साधला. तसेच विभाग प्रमुखांचीही तातडीने बैठक बोलावली. याकडे लक्ष द्या, अन्यथा आपल्यालाही दोषी ठरवून कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
‘प्रसुतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या कळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ सोमवारी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर सकाळीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात हे वॉर्डमध्ये गेले. प्रसूत झालेल्या महिलांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून तक्रारी जाणून घेतल्या. तसेच वॉर्डमधील परिचारिका, डॉक्टर यांनाही सुचना दिल्या. वॉर्डची तपासणी झाल्यावर डॉ.थोरात यांनी सर्व विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. पैसे घेण्याचे प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. यामुळे रुग्णालयाची बदनामी होत आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. विभाग प्रमुख म्हणून आपलीही जबाबदारी आहे. वॉर्डमध्ये काय चालले आहे, याकडे लक्ष देणे बंधनकारक आहे. यापुढे तक्रार आल्यास आपणासही जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश हरिदास यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, डॉ.थोरात यांनी प्रत्यक्ष जाऊन रुग्णांशी संवाद साधल्याने समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्येही पैसे घेतले जात असतील तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी त्या दृष्टीने फिल्डिंग लावली आहे.तक्रारी द्या; चौकशी करूयापुर्वीही ज्या लोकांकडून जिल्हा रुग्णालयात अनाधिकृतपणे पैसे वसुल केले आहेत, अशांनी तक्रारी द्याव्यात. याची गंभीर दखल घेऊन चौकशी केली जाईल. जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी मग्रुर व कामचुकार कर्मचाऱ्यांवर थेट कारवाया केल्या जातील. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तक्रार देणाºयांची नावे गोपनीय ठेवले जाणार असल्याचा विश्वास जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिला आहे. आता किती नागरिक पुढे येऊन तक्रारी देतात, हे वेळच ठरविणार आहे. कामचुकार व रुग्णांकडून पैसे वसुल करणाºयांची हकालपट्टी करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
निलंबनाची टांगती तलवारजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांनी रुग्णांशी संवाद साधल्यावर त्यांना काही गोष्टींमध्ये तथ्य आढळले. त्यामुळे दोषींवर निलंबनाची टांगती तलवार आहे. मंगळवारी चार कर्मचाºयांवर कारवाई होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. डॉ.थोरात व डॉ.हरिदास यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पाऊले उचलली आहेत.
कर्मचा-यांमध्ये खळबळ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित झाल्याचे समजताच जिल्हा रुग्णालयात एकच चर्चा सुरू झाली. रुग्णांमधून वृत्ताचे स्वागत झाले तर वसुली करणाºयांचे धाबे दणाणले होते. दिवसभर वृत्ताने कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली होती.