माजलगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या आजारातून बरे झालेल्या तालुक्यातील नित्रुड येथील एका रुग्णाचा म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने औरंगाबाद येथे ४ मे रोजी मृत्यू झाला. आता या नव्या आजाराचे संकट कोरोना रुग्णांवर घोंगावत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांना अचानक डोके दुखणे, डोळा सुजणे-दुखणे, नजर कमी होणे, डबल दिसणे,नाकातील श्वास कोंडणे, दात हालणे, दात दुखणे ही लक्षणे दिसून येतात, असे पाच रुग्ण माजलगावात आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये अगोदरच भीतीचे वातावरण असतांना ही घटना घडली आहे. तालुक्यातील नित्रुड येथील ४६ वर्षीय इसमास एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्याचा सुरुवातीचा स्कोअर ९ होता. माजलगाव येथे कोविड केअर सेंटरमध्ये उपचारानंतर तो बरा होऊन घरी परतला होता.
मागील दहा दिवसांपूर्वी डोके दुखत असल्याने त्याने खाजगी डॉक्टरांना दाखवले, त्याचे सिटीस्कॅन केले असता २९ एप्रिल रोजी स्कोअर ४ आला. त्यामुळे त्यास घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. परंतु घरी तो बोबडे बोलत असल्याने डॉक्टरांनी अर्धांगवायूवर उपचार केले असता बोबडी जास्त वळून डोळ्यास सूज आली म्हणून औरंगाबाद येथे दाखवले. तेथे तपासण्या झाल्या, दरम्यान रूग्णाचा एक हात व पाय निकामी झाला. ३ मे रोजी आलेल्या तपासणी अहवालात त्या रुग्णास म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले.
आजार मेंदूपर्यंत पोहचल्याने उपचारासाठी तीन सर्जन लागतात व डोळा दुरुस्त होण्याची शक्यता नाही, असे सांगितल्याने नातेवाईकांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतु रूग्णाचे ऑक्सिजन कमी झाल्याने प्रकृती खालावली. दरम्यान ४ मे रोजी त्याचा मृत्यू झाला अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. कोरोना रुग्णांचे अगोदरच वाढते मृत्यू प्रमाण व आता नवीन रोगाचा धोका संभवत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
--------
कोविडनंतरचे हे कॉम्प्लिकेशन आहे. पस होणे, अवयवांवर त्याचा परिणाम होतो. अशा होणाऱ्या मृत्यूंमध्ये म्युकरमायकोसिसचा हातभार असू शकतो. त्यामुळे कोविडनंतरही सतर्क राहण्याची गरज आहे. छोट्या- मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता जवळच्या डाॅक्टरांशी संपर्क करून वेळीच उपचार करून घ्यावेत. - डॉ. यशवंत राजेभोसले, माजलगाव.