बीड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पोलीस आणि आरोग्य विभागावर कामाचा ताण येत आहे. त्यांच्याकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने सामाजिक न्याय विभागाचे ५०० कर्मचारी सहकार्य करण्यासाठी मदतीला देण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यासह पोलिसांना पेट्रोलिंग व बंदोबस्तासाठी मदत करणार आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनत आहे. उपाययोजना आणि नियोजन करताना प्रशासनासह आरोग्य विभागाची धावपळ होत आहे. त्यातच अपुरे मनुष्यबळ असल्याने आणखीनच अडचण बनत आहे. हाच धागा पकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांना पोलीस आणि आरोग्य विभागाला मदत करण्याबाबत सूचना केल्या. यात आश्रमशाळा मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, पहारेकरी, वसतिगृह अधीक्षक, लिपिक यांचा समावेश आहे. हे सर्व लोक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील. काही कर्मचारी बंदोबस्त आणि पेट्रोलिंगलाही मदत करणार आहेत, तर काही चेकपोस्टवर काम करतील. याबरोबरच कोविड केअर सेंटर आणि माहिती देवाण- घेवाण करून वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहेत. अगोदरही जवळपास ३०० कर्मचारी कोरोना लढ्यात काम करत होते. आता आणखी ५०० कर्मचाऱ्यांची भर पडल्याने पोलीस व आरोग्य विभागाला मदत मिळाली आहे. आता या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक आणि तत्पर कर्तव्य बजावणे आवश्यक आहे.
....
अगोदर ३०० कर्मचारी कोरोना लढ्यात काम करत होते. आता आणखी ५०० कर्मचारी पोलीस व आरोग्य विभागाच्या मदतीला दिले आहेत. ते सर्व कामे करतील. याबाबत आदेशही काढण्यात आले आहेत.
-डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, बीड.