- सोमनाथ खताळ
बीड : आरोग्य विभागाच्या लातूर उपसंचालक कार्यालयात कार्यरत प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याला पिशवीतून पैसे पुरवणारा शिपाई श्याम मस्के याला शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे (Health Department leak Case ) . पुण्याच्या सायबर पोलिसांकडून मिळालेले पत्र आणि संचालकांच्या आदेशानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी ही कारवाई केली आहे. श्याम हा शिपाई असला तरी तो बडगिरेचा उजवा हात होता. शिवाय सर्व पैसे वसुलीची जबाबदारी श्याम सरकारी नोकरीपेक्षाही चोखपणे पार पडत होता, असे सूत्रांकडून समजते.
३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षेचा पेपर फुटला. यात प्रशांत बडगिरेसह लोखंडी सावरगावच्या रुग्णालयातील डॉ. संदीप जोगदंड, शिरूर तालुक्यातील शिक्षक उद्धव नागरगोजे, बीडचा रहिवासी असलेला; परंतु भूममध्ये सहायक अधीक्षक असलेला राजेंद्र सानप आणि नेकनूर स्त्री रुग्णालयात पदस्थापना असतानाही बडगिरेच्या आशीर्वादाने लोखंडी सावरगावात प्रतिनियुक्तीवर काम करणारा श्याम मस्के या शिपायाला पुणे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच प्रकरणात सहसंचालक महेश बाेटले यालाही अटक करण्यात आली. बोटले आणि बडगिरे हेच पेपरफुटी प्रकरणाचे मास्टरमाइंड असल्याचे तपासातून उघड झाले होते; परंतु पैसे जमा करण्यासाठी बडगिरेने श्याम मस्के या शिपायाची खास नियुक्ती केली होती. कोणत्याही प्रकरणात बडगिरे हा मस्केमार्फतच पैसे स्वीकारत होता. हे काम मस्के चोखपणे पार पडत असे.
दरम्यान, सायबर पोलिसांच्या तपासात श्याम मस्के हा दोषी असल्याचे दिसताच त्यांनी बीडच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून मस्केवर कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी श्याम मस्केवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात बीड जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याचे आदेशही डॉ. साबळे यांनी दिले आहेत.
सहा लाख रुपयांचा दरया पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी बीडमधून नामदेव विक्रम करांडे (वय ३१, बीड ) या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या विद्यार्थ्याने बडगिरेला आठ लाख रुपये दिल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येकाकडून सहा लाख रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नामदेवनेच आठ लाख का दिले? याचा तपास पोलीस घेत आहेत. तसेच नामदेवप्रमाणेच आणखी विद्यार्थी बीडमध्ये असण्याची दाट शक्यता असून, सायबर पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.
निलंबनाची कारवाई सायबर पोलिसांचे पत्र व संचालकांच्या आदेशावरून श्याम मस्के या सफाईगारावर निलंबनाची कारवाई केली आहे. याचा अहवालही वरिष्ठांना पाठविला आहे.-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
नाव येतील त्यांना अटक होईल बीडमधून एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. एका विद्यार्थ्याकडून बडगिरेने साधारण पाच ते सहा लाख रुपये घेतल्याचे दिसून येत आहे. तपास चालूच असून, ज्यांचे नाव येतील त्यांना अटक केली जाईल.-डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे