बीड : जिल्हा रूग्णालयातील कामचुकार डॉक्टरांमुळेआरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला होता. हाच धागा पकडून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी चार दिवसांत दुसऱ्यांदा अचानक भेट देत कामचुकार डॉक्टरांची हजेरी घेतली. नेत्यासारखे कपडे घालून रूबाब गाजविणारे डॉक्टर आज पहिल्यांदाच गळ्यात स्टेथोस्कोप घालून अॅप्रनमध्ये दिसले. उपसंचालकांच्या भेटीमुळे आरोग्य प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.
मागील काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालयाचा कारभार बिघडला होता. बाह्य रूग्ण तपासणी विभागात डॉक्टर बसत नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना तासनतास ताटकळत बसावे लागत होते. तसेच अंतरूग्ण विभागातही डॉक्टर वेळेवर राऊंड घेत नाहीत. घेतला तर रूग्णांना काळजीपूर्वक न तपासता केवळ कागदी घोडे नाचवित होते. याच तक्रारी वाढल्याने आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांना अस्थि व बालरोग विभागात एकही डॉक्टर आढळला नव्हता. त्यांना नोटीस बजावली होती. यासोबतच अॅप्रन नसल्याने एका डॉक्टरचे वेतन कपात करण्याची त्यांनी सूचना केली. शिकाऊ डॉक्टर, नर्सींगच्या विद्यार्थिनींचीही हजेरी घेत त्यांनी तसेच इतर अनेक सुचना केल्या होत्या. यावेळी बीडचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही. शिंदे, मेट्रन मंदा खैरमोडे, परिसेविका संगिता सिरसाट आदी त्यांच्यासमवेत होते.
अन् सर्व परिसर चकाचकउपसंचालक डॉ.माले यांनी स्वच्छतेवर अधिक भर दिला. सर्व रूग्णालय स्वच्छतेसह बेडवरील कपडा, कचरा पेटी जागेवर टापटिप दिसले. तसेच ओपीडीमध्ये प्रत्येक डॉक्टर ठाण मांडून होते. आज रूग्णालयात वेगळेच वातावरण पहावयास मिळाले. यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे.
शासकीय रूग्णालयात दर्जेदार व तत्पर उपचार मिळावेत, या दृष्टीने सर्वांना सुचना करून आदेश दिले आहेत. जे डॉक्टर, कर्मचारी कामचुकारपणा करतील तसेच युनिफॉर्म मध्ये नसतील त्यांना रूग्णालयाच्या परिसरात प्रवेश बंदी असेल. तरीही ते आले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणालाही माफी नाही.- डॉ.एकनाथ माले, उपसंचालक, आरोग्य विभाग लातूर