कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
बीड : जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही तरीही नागरिक बिनधास्तपणे वागत आहे. तज्ज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरीही नागरिक सामाजिक भान न ठेवता विनामास्क वावरत आहेत.
महावितरणला समस्यांचे ग्रहण
अंबाजोगाई : ग्रामीण भागात सध्या विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विजेची मागणी ज्याप्रमाणे वाढत चालली आहे, त्याप्रमाणे पुरवठा उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक विद्युत पंप अपुऱ्या वीजपुरवठ्याअभावी बंद पडू लागले आहेत. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त स्थितीत असल्याने ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे पार्ट, ऑईलची कमतरता आहे.
नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त
अंबाजोगाई : काही दिवसांपासून अंबाजोगाई व परिसरात बी.एस.एन.एल.ची रेंज उपलब्ध होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. इंटरनेटही चालत नाही तसेच परस्परांशी संवादही होत नाही. महागडे रिचार्ज करूनही ग्राहक अडचणीत आहेत. बी.एस.एन.एल.च्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
शिरूर-केज रस्त्याची दुरवस्था
केज : तालुक्यातील शिरूर ते केज रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत गाव, वाड्या, वस्त्या आहेत. नागरिकांची बाजारपेठ केज असल्यामुळे वावर जास्त असते.