बीड : जिल्हा रूग्णालयातील प्रभारीराजचा फटका रूग्णांना बसण्यास सुरूवात झाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी वाशी (जि.धाराशिव) येथे आरोग्य शिबीर आयोजित केले होते. यात बीडचे रेडिओलॉजिस्टही जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाठविले. याचा फटका बीडमधील गर्भवती व इतर जवळपास ४०० रूग्णांना बसला. डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना तपासणी न करताच परतावे लागले. या निमित्ताने जिल्हा रूग्णालयातील ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.
सर्वच शासकीय संस्थांमध्ये उपचार आणि सेवा मोफत झाल्या आहेत. त्यामुळे १५ ऑगस्टपासून रूग्णसंख्या वाढली आहे. जिल्हा रूग्णालयात तर ओपीडी आणि आयपीडी विभाग कायम गजबजलेला असतो. परंतू त्यांना सुविधा पुरविण्यात आरोग्य विभाग कमी पडत आहे. जिल्हा रूग्णालयातच सोनोग्राफी, एक्स -रे आणि सीटीस्कॅन विभाग आहे. येथे दोन रेडिओलॉजिस्ट आहेत. परंतू यातील एका डॉक्टरची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी वाशी येथे आयोजित केलेल्या शिबीरासाठी नियूक्ती करण्यात आली तर दुसरे डॉक्टर अनाधिकृत गैरहजर राहिले. याचा फटका सामान्य रूग्णांना बसला.
सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवती महिलांचे सर्वात जास्त हाल झाले. गर्दीत धक्के खात त्यांना तपासणी न करताच परतावे लागले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हा रूग्णालयात हक्काचे जिल्हा शल्य चिकित्सक नसल्यानेच अशी अवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्याकडून केवळ पत्रक काढून कारभार सुधारल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक पाहता आजही वेळेवर राऊंड हाेत नाहीत. डॉक्टर ओपीडीत बसत नाहीत. तसेच काही सीएसचा वचक नसल्याने अनाधिकृत गायब होत आहेत. याचा त्रास सामान्यांना होत आहे.
पगार कपात होणारसोनोग्राफी विभागातील दोनपैकी एका डॉक्टरला वाशी येथे आरोग्य शिबीरासाठी पाठविले आहे. दुसरे डॉक्टर अनाधिकृत गैरहजर राहिले आहेत. त्यांची पगार कपात करण्यात येईल.- डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक बीड