- सोमनाथ खताळबीड : एखाद्या मंत्र्यांच्या सुरक्षेला लाजवेल अशी सुरक्षा देत आरोग्य विभागाचा पेपर विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बीडमध्ये आणल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना आणताना आणि परत नेऊन सोडताना मागे-पुढे वाहनांचा ताफा होता, अशी चर्चा आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेले व चौकशीसाठी नेलेल्या संशयितांनी अनेकांची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमध्येच जास्त आरोपी सापडत आहेत. ज्या आरोपींनी पेपर विकला त्यांनी लातूर, जालना, औरंगाबाद, येथील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वाहनातून बीडला आणल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी याच एजंटांनी वाहने पाठविली होती. बीडमध्ये आल्यावर त्यांना एका मंगल कार्यालयात बसविले. येथे सर्व उत्तरे पाठ करून घेण्यात आली. त्यानंतर याच वाहनातून त्यांना परत त्यांच्या गावी सोडण्यात आले. याची कोठेही वाच्यता करायची नाही, अशी अटही त्यांना घालण्यात आली होती.
गाडीत बसण्यापूर्वी या सर्व एजंटांनी विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकाकडेही मोबाइल अथवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच पेन, कागद ठेवण्यास बंदी घालण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. याच दृष्टीने पोलीस तपास करत असून, यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याची माहिती गोळा केली जात आहे. याबाबत पुणे सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांना संपर्क केला; परंतु त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगितले.