- सोमनाथ खताळबीड : आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकट्या बीडमधून आठजणांना अटक केली आहे. असे असले तरी आकडा थांबलेला नाही. सर्व संशयित बीडमध्येच असल्याने पुणे पोलिसांचा बीडवर विशेष डोळा असल्याचे समजते. सोमवारी अटक केलेल्या भाजयुमोचा माजी पदाधिकारी संजय सानप याच्या संपर्कातील कुटाणेखोर नातेवाइकांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांचे बीड कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. सुरुवातीला अटक केलेला लातूर उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने बीडमध्येच नोकरी केली आहे. त्यापाठोपाठ लोखंडी सावरगाव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप जोगदंड, नेकनूर रुग्णालयातील शिपाई श्याम मस्के, भूममध्ये कार्यरत असलेला; परंतु मूळचा बीड रहिवाशी असलेला राजेंद्र सानप, नामदेव करांडे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यातच सोमवारी भाजयुमोचा माजी पदाधिकारी असलेल्या संजय सानपलाही बेड्या ठोकल्या. त्याच्याकडूनही पुणे पोलिसांना महत्त्वाचे धागेदाेरे हाती लागल्याचे समजत असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
बीडमध्ये पथकाकडून झाडाझडतीराजेंद्र सानप, संजय सानप यांचे मूळ गाव असलेल्या वडझरी (ता.पाटोदा) येथील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. यात त्यांना काही कार्बन कॉपी हाती लागल्याचे सूत्रांकडून समजते. याच गावातील संजय व राजेंद्र यांच्या संपर्कातील नातेवाईक आठवड्यापासून गायब आहेत.
प्रवासी गोळा करणाऱ्याला बनविले आरोग्य कर्मचारीबीड-पाटोदा या मार्गावर अवैध वाहतूक करण्यासाठी प्रवासी गोळा करणाऱ्या जवळच्या नातेवाइकाला सानप बंधूंनी आरोग्य कर्मचारी बनविले आहे. या लोकांनी बोगस प्रमाणपत्र देऊन अनेकांना नोकरीला लावल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व संशयित रजा टाकून गायबसंजय व राजेंद्र सानप यांच्या संपर्कातील संशयित हे आरोग्य कर्मचारीच आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पाटोदा तालुक्यातील रहिवाशी आणि त्याच तालुक्यात कार्यरत आहेत. हे सर्वच लोक सध्या रजा टाकून गायब आहेत.
पदवीचे शिक्षण सोडून घोटाळामाजलगाव येथे नोकरी केलेले एक अधिकारी पदव्युत्तर शिक्षणासाठी बाहेर गेले; परंतु त्यांनीही यात १३ उमेदवारांसाठी पैसे घेऊन 'फिल्डिंग' लावली होती, अशी चर्चा आहे. यात जिल्हा रुग्णालयातील 'मॅन'ला मध्यस्थी म्हणून 'कॉल' देण्यात आल्याचे समजते.