- अविनाश कदम
आष्टी : कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दोन दिवसात अॅन्टीजन टेस्ट करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यासाठी शहरात दोन ठिकाणी आरोग्य पथक सकाळी ९ वाजेपासून सज्ज आहे. परंतु, दुपारी १२ वाजेपर्यंत एकही व्यापारी व कामगार या कॅम्पकडे फिरकला नसल्याचे चित्र आहे. कोरोना प्रसार वेगात होत असला तरी व्यापाऱ्यांनी टेस्ट करून घेण्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे.
आष्टी तहसील कार्यालयात गुरुवारी प्रशासन व व्यापारी यांची कोरोनाबाबत एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने मास्क न लावणारांना दंडात्मक कारवाई करा, जनजागृती करा एवढ्यावर, जाणूनबुजून कोणी नियमांकडे दुर्लक्ष करत असेल तर कायद्याचा धाक दाखवा. तसेच सर्व व्यापाऱ्यांनी दोन दिवसांत कोरोनाची अॅन्टीजन टेस्ट करुन घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. यानुसार शहरात आज कन्या प्रशाला शाळा खडकत व जिल्हा परिषद शाळा मुलांची आष्टी (पोलीस स्टेशन शेजारी) येथे ॲन्टीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत इथे एकही व्यापारी किंवा कामगार टेस्टसाठी आले नव्हते. सर्व आरोग्य यंत्रणा सकाळी ९ वाजेपासून सज्ज झाली होती.
या ठिकाणी आहेत आरोग्य पथकजिल्हा परिषद शाळा पोलिस स्टेशनरोड येथील कॅम्पमध्ये वैद्यकीय अधिकारी डाॅ.एम.आय.सय्यद, लॅब टेक्निशन पी.पी.देशमुख, बी.के.झगडे, आरोग्यसेवक तात्या धोंडे, पी.आर.धस, आरोग्य सहायक एन. एस.गर्जे, आरोग्य सेवक के.एस.सय्यद, तर मुलींची कन्या शाळा कॅम्पमध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जयचंद नेलवाडे, आरोग्यसेवक पारेकर पंढरीनाथ, दिगंबर ओंगाळे, कारंडे नागेश, संतोष आठरे, आरोग्य सहाय्यक एस.एम. वाळके, वाळेकर दिपक आदी कर्मचाऱ्यांचे पथक तैनात आहे.