बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभाग शेतकऱ्यांसह इतरांच्या आत्महत्या राेखण्यात अपयशी ठरू पाहत आहे. मार्गदर्शन, समुपदेशनाच्या नावाखाली भेट देण्याचे कारण सांगत हा विभाग केवळ पर्यटन दौरे काढून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारीही १० सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवशी तब्बल तीन तरुणांनी जीवनयात्रा संपविली. प्रकल्प प्रेरणा विभाग मात्र, शुक्रवारी सुटी असल्याने गुरुवारीच कार्यक्रम घेऊन कागदोपत्री अहवाल तयार करून मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांत तब्बल ३८८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. तसेच युवक, तरुण व इतर वर्गातील आत्महत्येचा आकडा मोठा आहे. या आत्महत्या होऊ नयेत, यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यान्वित आहे; परंतु हा विभाग केवळ नावालाच आहे. येथील मानसोपचारतज्ज्ञ, कर्मचारी यांची कामात हलगर्जी होत असल्याने शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी देणे, मार्गदर्शन, समुपदेशन, शिबिरे घेण्याच्या नावाखाली हा विभाग कायम बाहेर फिरत असतो; परंतु भेटीच्या नावाखाली येथील कर्मचारी पर्यटन दौरे करून लाखोंची उधळपट्टी करत असल्याचे उघड झालेले आहे. प्रत्यक्षात भेटी देत नसले तरी कागदोपत्री अहवाल तयार करण्यात येथील काही कर्मचारी माहीर आहेत. या कागदोपत्री कामामुळेच जिल्ह्यात रोज तरुण, युवक, शेतकरी अथवा इतर वर्गातील लोक जीवन संपवीत असल्याचे दिसते. या विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
--
यांनी संपविली जीवनयात्रा
मागीज २४ तासांत जिल्ह्यात तीन तरुणांनी जीवन संपविले आहे. यात अनिल देवीदास कोळेकर (वय ३५ वर्षे, रा. जांब, ता. शिरूर) गळफास घेतला. तसेच गेवराई तालुक्यातील मारफळा येथील विलास लक्ष्मण वमने या ३० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गुरुवारी रात्री गळ्याला दोर लावत आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत लहू दशरथ सरवदे (वय ३०, रा. साळेगाव, ता. केज) या तरुणाने शुक्रवारी सकाळी शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
--
प्रकल्प प्रेरणाच्या तक्रारी वाढत आहेत. याची चौकशी केली जात आहे. लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
100921\10_2_bed_23_10092021_14.jpeg
प्रकल्प प्रेरणा