गेवराई : तालुक्यातील सिरसदेवी, भेंडटाकळी, अर्धामसला शिवारात गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे बामणी नदी तब्बल चार वर्षानंतर प्रवाही झाली. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक जवळपास २ तास ठप्प झाली होती.
तालुक्यातील गुरूवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. सिरसदेवी, अर्धामसला, भेंडटाकळी, वाहेगावसह विविध भागातील ओढ्याला, नाल्याला पाणी आले. परिसरात झालेल्या पावसाने भेंडटाकळी येथील बामणी नदी तब्बल ४ वर्षांनंतर प्रवाही झाली असल्याची माहिती येथील नागरिक विशाल कोळपे यांनी दिली. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने भेंडटाकळी ते नाथापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले.
यामुळे या मार्गावरील वाहतुक तब्बल दोन तास बंद झाली होती. पुलाच्या दोन्ही बाजुने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. धोकादायक वाहणाऱ्या पाण्यातून काही नागरिक, महिला मार्ग काढत निघाले. यात देवदर्शनासाठी गेले एक नव विवाहित जोडपेही होते.
तर काही दुचाकीस्वारांनी देखील यातून मार्ग काढला. या पावसाने परिसरातील शेतकरी सुखावला असुन पेरण्याला वेग आला आहे.