अंबाजोगाई-:अंबाजोगाई तालुक्यात पावसाचा तडाखा सुरूच आहे.शनिवारी सायंकाळी ४ नंतर तालुक्यातील पाटोदा,ममदापुर सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली.या पावसात अनेक शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेले सोयाबीन वाहून गेल्याने राहिलेला शेवटचा घास ही निसर्गाने हिरावुन नेला.
अंबाजोगाई तालुक्यात जून च्या प्रारंभी पासूनचं जोरदार पाऊस पडत आहे. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासुन तालुक्यात अतिवृष्टी सुरू झाली.ती अद्याप ही सुरूच आहे. चार दिवस पाऊस बंद राहिल्याने शेतकरी पावसाच्या तडाख्यातून उरलेल्या सोयाबीनची काढणी सुरू होती.अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच पडुन होते.मात्र शनिवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सोयाबीन चे ढीग मोठया प्रमाणात वाहून गेले. शेतात सर्वत्र पाणी साठल्याने शेतांनाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अगोदरच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतरस्ते वाहून गेलेले आहेत.
या रस्त्यांवरून पाणी वाहू लागल्याने शेतात जाणेही मोठ्या मुश्किलीचे ठरू लागले आहे. आजच्या अतिवृष्टी ने पुन्हा नद्या,ओढे,नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर अनेकांच्या शेतातूनही ओढ्या प्रमाणे पाणी वाहून जात असल्याने शेतजमिनी खरडुन गेल्या आहेत.सातत्याने पडणाऱ्या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.