कडा (बीड) : मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेले पिकांचे डोळ्यादेखत नुकसान झाले. यामुळे उसनवारी, बँकेकडून घेतलेलं कर्ज कसे फिटेल या विवंचनेत तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आष्टा येथे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सोमनाथ अशोक माळवे ( ३१ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील हरिनायण आष्टा येथील शेतकरी सोमनाथ माळवे याने राष्ट्रीयकृत बॅकेचे कर्ज काढून शेती पिकवली. काही रक्कम हात उसनी देखील घेतली होती. पण जोरदार पावसाने सध्या हातातोंडाशी आलेले शेतातील पिक पाण्यात गेले. हाती काहीच उत्पन्न मिळणार नसल्याने बॅकेचे कर्ज आणि हात उसनी रक्कम कशी फेडायची या विवंचनेत सोमनाथ होता. यातूनच टोकाचे पाऊल उचलत त्याने आज सकाळी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आईवडिल, पत्नी, मुली असा परिवार आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तरुण शेतकरी सोमनाथ याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंबाला प्रशासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश कराड यांनी केली आहे.