गेवराई ( बीड ) : गेवराई तालुक्यात सोमवारी दिवसभर रिमझिम पावसानंतर मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. यातच हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचे सातत्य आणि मोठा विसर्ग यामुळे गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी वाढली आहे. तसेच सिंधफना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पैठण तालुक्यातील हिरडपुरी उच्च पातळी बंधारा आज 91.60 % क्षमतेने भरला आहे. बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे. पाण्याची आवक वाढल्याने बंधाऱ्याचे दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता उघडण्यात आले. त्यामधून गोदावरी नदीच्या पात्रात 12 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पांचाळेश्वर, राक्षसभुवन,सुरळेगाव, म्हाळसपिंपळगावंसह विविध गावातील गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली आहे.
Video : नामी शक्कल ! पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार
तसेच तालुक्यातील राजपुरकडे जाणाऱ्या कापशी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. अर्धामसला गावात जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या सिंदफना नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. गोदावरी व सिंदफना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, जनावरे त्या परिसरात सोडू असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.