धारूर
: दिवसेंदिवस चढता पारा, असह्य उकाडा असताना आणि वैशाख वणवा सुरू होण्याआधीच तालुक्यातील नागरिकांना मुसळधार पावसाचा अनुभव आला. रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नागरिक चक्रावून गेले. काही गावांना जोडणाऱ्या नदीवरील पुलावर पाणी वाहत होते. दरम्यान या पावसामुळे फळबागा आणि भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले असून अंजनडोह येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला.
तालुक्यात सतत तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. रविवारी दुपारी दीड तास वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. पावसाळ्यात मोठा पाऊस व्हावा, असा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. कुंडलिका, वाण, सरस्वती नद्याही भरून वाहत होत्या. रुईधारूर जहागीरमोहा, अंबेवडगाव येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती. नागरिकांना नदीकाठी ताटकळावे लागले.
फळबागांचे नुकसान
तालुक्यातील आरणवाडी, रुईधारूर, अंजनडोह, पहाडी पारगाव, धुनकवड ,जहागीरमोहा, सोनीमोहा, आवरगाव येथे फळबागांचे मोठे नुकसान झाले. विविध ठिकाणी शेतातील कोठ्यांवरील पत्रे उडून जाण्याचे अनेक प्रकार घडले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
अंजनडोह बैल ठार
तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकरी शंकर हरिश्चंद्र रेपे यांचा बैल वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वीज पडून जागीच ठार झाला. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले असताना हे नुकसान झाले. या घटनेचा तत्काळ पंचनामा करून प्रशासनाने मदत देण्याची मागणी योगेश साखरे यांनी केली आहे.