लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हेल्मेट असतानाही केवळ कंटाळा करीत ते दुचाकीला पाठीमागे लटकवले. बीड-गेवराई मार्गावर बीड तालुक्यातील पारगावजवळ या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यात तो दूर फेकला गेला आणि डोक्याला गंभीर मार लागला. परिसरातील लोकांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. सध्या या तरूणावर औरंगाबादमधील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. हेल्मेट न वापरणाऱ्यांसाठी हे ज्वलंत उदाहरण निर्माण झाले आहे.अण्णासाहेब राजेंद्र बाराते (वय ३० वर्षे, रा. बारातेवाडी ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे जखमी तरूणाचे नाव आहे. आण्णासाहेब हे औरंगाबादमध्ये उच्च न्यायायालयात वकील आहेत.मंगळवारी ते आपल्या गावी दुचाकीवरून (एमएच २० बीएस ६५२४) निघाले होते. यावेळी त्यांनी आपल्याजवळील हेल्मेट डोक्याला न घालता पाठीमागे लटकवले. पारगावजवळ येताच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली. मोठा रक्तस्त्रावही झाला. इतर लोकांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला जास्त मार असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्यांना तातडीने औरंगाबादला हलविले. सध्या आण्णासाहेब हे मृत्यूशी झुंज देत आहेत. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
हेल्मेट असून गाडीला लटकविले; डोक्याला इजा झाल्याने मृत्यूशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:51 PM