कोरोनाने रोखली भिक्षा : एरंडोलचे उपजिल्हाधिकाऱ्यांकडून १४ कुटुंबांना किराणा किट
माजलगाव: राष्ट्रीय महामार्गावर फुले पिंपळगाव शिवारात पालावर राहून भिक्षुकी मागणाऱ्या गोसावी समाजावर लॉकडाऊन व गावबंदीमुळे उपासमारीची वेळ आली असताना जळगाव जिल्ह्यातील एरंडोलचे उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांनी सामाजिक कार्यकर्ते भास्कर गिरी यांच्यामार्फत १४ कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढा किराणा वाटप केला आहे. आणखी २६ कुटुंबांना किराणा किटची आवश्यकता असून, यांच्याकरिता दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.
माजलगाव तालुक्यातील पालावर राहणारे औंढा व हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गरीब गोसावी समाजाचे हे कुटुंब खेडोपाडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतात; मात्र सध्या वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे गावबंदी केल्याने भिक्षा बंद झाली आहे, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे समजल्यानंतर उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांनी सामाजिक कार्यकर्ते भास्कर गिरी यांना फोनवर संपर्क करून पालावर राहणाऱ्या गोसावी समाजाची माहिती घेतली. गोसावी यांनी लगेच व्यवस्था करून २९ एप्रिल रोजी दुपारी माजलगाव येथे १४ कुटुंबांना किराणा किट भास्कर गिरी यांना वाटप करण्यास सांगितले. गिरी यांनी सहकारी पुरुषोत्तम करवा, उमेशकुमार जेथलिया, प्रा. सुदर्शन स्वामी, रविकांत उघडे, विजय मस्के यांना सोबत घेऊन तत्काळ किराणा किटचे वाटप केले आहे. ही सर्व मदत विनय गोसावी यांनी केली.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांना भिक्षेसाठी जाता येत नाही. म्हणून ही तत्काळ मदत आहे. आणखी कोणी राहिले असेल तर त्यांनाही किराणा किट देऊन मदत केली जाईल.- विनय गोसावी,
उपजिल्हाधिकारी, एरंडोल जिल्हा जळगाव.
===Photopath===
290421\3215purusttam karva_img-20210429-wa0024_14.jpg