कडा : आष्टी तालुक्यातील कानडी (खुर्द) हे गाव गावाजवळच्या मेहकरी प्रकल्पामुळे मेहकरी नावाने ओळखले जाते. आत्मोन्नतीसोबतच गरजू महिलांना मदतीचा उपक्रम येथील बचत गटांनी राबविला. गावातील महिला बचत गटाच्या समूह संसाधन व्यक्ती म्हणून काम करणाऱ्या जैबूनबी उस्मानखान पठाण यांनी याबद्दल लोकमतला माहिती दिली.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून कानडी गावात नोव्हेंबर २०१७ मध्ये महिला बचत गटाची सुरुवात झाली. गावात एकूण नऊ बचत गट असून या गटांचे नियंत्रण विकास महिला ग्राम संघ करतो. नऊ बचत गटांचे अध्यक्ष आणि सचिव या विकास संघात संचालक आहेत. सुनीता गव्हाणे याच्या अध्यक्ष , प्रियांका साके सचिव आणि अर्चना बनसोडे कार्याध्यक्ष आहेत. प्रत्येक बचत गटाकडे प्रत्येकी १५ हजार रुपयांचा फिरता निधी, ६० हजारांचा समूह गुंतवणूक निधी आणि बँकेने मंजूर केलेले एक लाख रूपये याप्रमाणे भागभांडवल उपलब्ध आहे. यातून गरजू महिलांना छोट्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. शेळीपालन, कोंबडीपालन, दुग्धव्यवसाय, गिरणी, किराणा दुकान यासारख्या व्यवसायाच्या वाढीसाठी महिला ही कर्ज रक्कम वापरतात. २ टक्के दराचे हे कर्ज तीन महिन्यांत चुकते करतात. या बचत गटाच्या संघाने जुलै २०२०‘ मध्ये ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर शेतकऱ्यांना १७ टन खते बांधावर उपलब्ध करून दिली होती.त्याचप्रमाणे गरीब , एकल, विधवा अशा गरजू महिलांना धान्य वाटपदेखील करण्यात आले.
चार गुंठ्यांत परसबाग, सेंद्रिय भाजीपाला
महत्त्वाचे म्हणजे या बचत गटातील महिलांनी पठाण यांच्या शेतात चार गुंठ्यांची परसबाग केली असून त्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिके उत्पादित केली आहेत. त्यातील भाजीपाला कधी मोफत तर कधी विकत दिला जातो.महिला बचत गटाच्या या चळवळीने महिला फक्त एकत्रच आल्या आहेत असे नाही तर त्यांनी बँकिंग व्यवहाराबरोबर सामाजिक कार्याची जाणीव देखील विकसित केली आहे. फोटो- महिलांनी तयार केलेली चार गुंठे क्षेत्रातील परसबाग.
230921\23bed_4_23092021_14.jpg~230921\23bed_3_23092021_14.jpg