मुंबई/बीड - शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे गेल्या दोन दिवसांपासून अधिकच चर्चेत आहेत. बीडमधील त्यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमाच्या नियोजनदरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांचा झालेला वाद चर्चेत होता. त्या वादात सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याचा दावा स्थानिक जिल्हाध्यक्षांनी केला होता. मात्र, सुषमा अंधारेंनी हा दावा फेटाळला. पण, या घटनेची राज्यभर चर्चा सुरू झाली. आता, येथील जाहीर सभेत बोलताना सुषमा अंधारेंनी भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फसवणूक केल्याचे म्हणत, त्यांचा एक व्हिडिओ दाखवला. त्यानंतर, त्यांची मिमिक्री करत खिल्लीही उडवली.
बीडमधील जाहीर सभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला चॅलेंज दिले. तुम्ही फक्त मोदींचा फोटो लावून निवडून जिंकून दाखवा, मी राजकारण सोडून देईल, असे राऊत यांनी म्हटले. तर, सुषमा अंधारे यांनीही मोदींच्या एका भाषणाचा व्हिडिओ दाखवत त्यांची खिल्ली उडवली. मोदी हे एक गणित समजावून सांगत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे. मात्र, त्या व्हिडिओला मॉर्फ करण्यात आलं असून त्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.
हे.. हे... आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत, जे आम्हाला ज्ञान पाजळतात. जे लोकांना वेड्यात काढतात, जे रोज नव्या थापा सांगतात, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी मोदींची मिमिक्री करुन दाखवली. तसेच, कोणाच्या खात्यात १५ लाख रुपये आले का, कोणाला नोकरी मिळाली, रोजगार मिळाला का? असा सवालही अंधारे यांनी केला. तसेच, सुषमा अंधारे हेच तर प्रश्न महाप्रबोधन यात्रेत विचारत आहे, जे त्यांना खुपतात, असे म्हणत भाजपला लक्ष्य केलं.
संजय राऊतांचंही भाजपला आव्हान
"आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तु्म्ही मते मागितलीत. असं अजिबात नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे हे १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत. कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या त्या सर्व ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. यावेळीही भाजपाने मोदींचे फोटो लावले होते, स्वत: मोदीही फिरले होते. मग पराभव का झाला? आता आमच्याकडून ४० 'मिंधे' गेले आहेत, त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं, राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगणार नाही", असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बीडमधील सभेत दिले.