बीड : कोरोनापासून बचाव करायचा असेल तर प्रतिबंधक लस घ्या. ही लस सुरक्षित आहे. आम्ही हात जोडतो पण लस घ्या, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागातील अधिकारी सोमवारी मुख्य रस्त्यांवरील चौकात उभा राहून करत होते. जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आता आरोग्य विभागासह प्रशासनाने कंबर कसली (Corona Vaccination In Beed )असून, मुख्य ठिकाणी रुग्णवाहिका उभा करून लाभार्थ्यांना लस टोचली जात आहे.
जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा टक्का इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. १८ वर्षांवरील एकूण लाभार्थी संख्या २१ लाख ५५ हजार एवढी आहे. परंतु आतापर्यंत केवळ १२ लाख ८५ हजार लोकांनीच लस घेतली आहे. याचे प्रमाण केवळ ५० टक्के आहे. तर, दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या तर अवघी ६ लाख ४ हजार एवढी आहे. याचे प्रमाण २८ टक्के आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडचे आकडे खूपच निराशाजनक आहेत. त्यामुळे मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची खरडपट्टी केली जात आहे. लसीकरणाचा टक्का वाढवा, असा तगादा रोजच लावला जात आहे. असे असले तरी टक्का वाढत नसल्याने आता प्रशासनाने काही नियम कठोर केले आहेत. लस घेतली तरच शासकीय कार्यालयांत प्रवेश, प्रमाणपत्र मिळणार नाही, अशा अनेक अटी टाकल्या आहेत. तसेच शहराच्या प्रवेशद्वारावर दोन रुग्णवाहिका थांबवून पोलिसांच्या मदतीने लाेकांना अडविले जात आहे. त्यांना लस घेण्याबाबत आवाहन केले जात आहे. याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.
लस सक्तीची नाही...कोरोना प्रतिबंधक लस घेणे सक्तीची नसल्याचे अनेकांकडून प्रशासनाला सांगितले जात आहे. यावर अधिकारी त्यांची समजूत काढतात. ही लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याची भीती कमी आहे. तसेच आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहाल, अशी जनजागृती केली जात आहे. तरीही काही लोक ऐकत नाहीत, वाद घालून निघून जात असल्याचेही सांगण्यात आले.
हे अधिकारी उतरले रस्त्यावरजिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, नोडल ऑफिसर डॉ. बाबासाहेब ढाकणे, समन्वयक डॉ. औदुंबर नालपे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी सोमवारी रस्त्यावर उतरल्याचे दिसले. बार्शी नाका, जालना रोड आणि नगर रोडवरील चऱ्हाटा फाट्यावरील लसीकरण केंद्राला त्यांनी भेटी दिल्या.
प्रतिसाद मिळत आहे आम्ही नागरिकांना विनंती करूनच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत आवाहन करत आहोत. काही लोक वाद घालतात, परंतु याला सुजान नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का खूपच कमी आहे. त्यामुळे अशाप्रकारे विशेष मोहीम राबवून लसीकरण केले जात आहे.- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड