अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई लातूर महामार्गावर अपघातांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. बुधवारी रात्री पोखरी फाट्यावर कार आणि टेम्पोच्या धडकेत पाच जखमी झाले होते. या अपघातानंतर अवघ्या तासाभरातच बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोरवड पाटीजवळ भरधाव वेगातील कार उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकून तिघे जण जागीच ठार तर एक जखमी झाला.
अंबाजोगाईकडून लातूरकडे भरधाव वेगात चाललेल्या कारने (एम. एच. ४४ यु ०६४७) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावरून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, मृत तिघे परळीचे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून अद्याप त्यांची नावे कळलेली नाहीत.
पोखरी फाट्यावर कार-टेंपोच्या धडकेत पाच जखमीपरळी येथील नितीन चौरे (३०), किरण बोबडे (३२), अजय राठोड (३०), संतोष हाळणे हे चौघे तरुण कारमधून लातूरला निघाले होते. ते सायगाव जवळ आले असता पोखरी फाट्यावर समोरून येणाऱ्या टेंपोसोबत त्यांच्या कारची धडक झाली. या अपघातात कारमधील चार तरुणांसह एक महिला गंभीर जखमी झाली. याचवेळी लातूरहून अंबाजोगाईकडे निघालेले आंनद सरवदे व जितेंद्र गायकवाड़ या शिक्षकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवले. सर्व जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.