गेवराई : लोकमतने अवैध वाळूउपस्याविरूद्ध वृत्त मालिका सुरु केल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आज दुपारी तहसीलदार व महसूल पथकाने राक्षसभूवन, म्हाळसपिंपळगाव या ठिकाणी छापे टाकून आठ ट्रॅक्टर, एक रोटर असा ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लोकमतच्या वृत्तमालिकेनंतर रजेवर असलेले तहसीलदार सचिन खाडे गुरुवारी रुजू झाले. आज सकाळी त्यांनी तहसिल कार्यलयात सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना घेऊन तहसिलदार सचिन खाडे वाळू माफियांवर कारवाईसाठी रवाना झाले.
यावेळी महसूल विभागाने दोन पथके बनवली. एका पथकात तहसिलदार सचिन खाडे तर दुसरे पथक नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांच्या नेतृत्वात होते. राक्षसभूवन व म्हाळसपिंपळगाव येथून आठ ट्रॅक्टर, पाच वाळू उपसा करण्यासाठीच्या केन्या आणि एक रोटर असा एकूण मिळुण तब्बल 80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई तहसिलदार सचिन खाडे,नायब तहसिलदार प्रशांत जाधवर, जितेंद्र लेडांळ, गजानन देशमुख,बाळासाहेब पखाले, नामदेव खेडकर,विठ्ठल सुतार, सह सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचा सहभाग होता.