गेवराई : अवैध वाळू उपसा होत असल्याच्या माहितीवरून तहसीलदारांच्या पथकाने आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील राक्षसभुवन येथे कारवाई केली. यावेळी पथकाने 5 हायवासह तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तालुक्यातील राक्षसभुवन येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळू उपसा सुरु आहे. याबाबत तक्रारी तहसीलदार सचिन खाडे यांच्याकडे करण्यात आल्या. दरम्यान, आज सकाळी राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाली. यावरून तहसीलदर खाडे यांच्या पथकाने सकाळी 7 वाजता राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्रात कारवाई केली. पथकाने वाळू उपास करत असलेल्या 5 हायवासह तब्बल 1 कोटी 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी गजानन देशमुख,बाळासाहेब पखाले,अक्षय डोफे,किरण लांडगे,निखिल तपसे यांच्या पथकाने केली. जप्त केलेले पाचही हायवा येथील तहसिल कार्यालयात लावण्यात आले आहेत. या मोठ्या कारवाईमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.