बीड : एचआयव्हीग्रस्त असल्याचा कांगावा करीत पाल्यास शाळेतून हाकलून देण्यात आल्याची तक्रार पालक मातेने शिक्षण विभागाकडे केली आहे. पाल्याचा एचआयव्ही रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगून व दाखवूनही विश्वास ठेवला जात नसल्याचे नमूद करून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी शिक्षणाधिकारी व अन्य अधिकारी पाली येथील परिवर्तन इंग्लिश स्कूलला भेट देऊन चौकशी करणार आहेत.
तालुक्यातील पाली येथील परिवर्तन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश पावती क्र. ३८ नुसार संदेश (नाव बदललेले आहे) यास दाखल केले होते. परंतु त्याचवेळी तुम्हाला शाळेत प्रवेश मिळणार नाही, तुम्ही येऊ नका, विनाकारण गावातील वातावरण तापवू नका, आम्हाला संस्था चालवायची आहे, असे म्हणून संबंधित पालकास परत पाठवले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा इन्फंट इंडियाचे संस्थापक दत्ता बारगजे यांनी कारण विचारून विनंती केल्यानंतर वर्षभर मुलास शाळेत बसू देणार नाही, या अटीवर प्रवेश दिला. परंतु अद्याप आपल्या मुलास शाळेत बसू दिले जात नसल्याचे पालक मातेचे म्हणणे आहे. पालक माता खासगी संस्थेत काम करीत असून, त्यांचे पती रुग्णवाहिका चालक आहेत. १० ऑगस्ट रोजी पाल्य संदेश यास शाळेत पाठविले असता त्याला तेथील शिक्षकांनी हाकलून दिले. मोबाइलवर संस्था प्रमुखांनी ‘शाळेत पाठवू नका’ असा संदेशही पालकांना पाठविला. पाल्याचा एचआयव्ही रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगून व दाखवूनही विश्वास ठेवला जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या संस्थेवर कठोर कारवाई करून मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था इतरत्र करावी, अशी मागणी पालक मातेने केली आहे.
तुमच्या शिक्षणाचा अधिकार सरकारला मागादरम्यान, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता परिवर्तन शाळेचे शिंदे व सरपंचांनी फोन करून पालक मेळावा व बैठकीला बोलावले. पालक माता, तिचा मुलगा संदेश इतर तीन महिलांसोबत शाळेत गेले होते. तेथे सर्व पालक व गावकरी आपल्या अंगावर आले. शाब्दिक बाचाबाची करून अजिबात शाळेत बसू देणार नसल्याचे बजावत धमकी दिली, अशी पालकांची तक्रार आहे. तुमचा मुलगा कसा शाळेत येतो तेच आम्ही पाहू, अन्यथा वाईट परिणाम होतील. तुमच्या शिक्षणाचा अधिकार सरकारला मागा. आम्हाला त्रास देऊ नका. जा इथून बऱ्या बोलाने, असे म्हणून हुसकावून लावल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेऊ परिवर्तन या खासगी शाळेतील विद्यार्थ्याच्या पालकांनी एचआयव्हीच्या कारणास्तव पाल्यास शाळेतून हाकलून दिल्याची तक्रार केली आहे. या पाल्यास प्रवेश दिला असून, शाळेत येऊ देत नसल्याची तक्रार आहे. ही बाब शिक्षणाधिकाऱ्यांना कळविली असून, गुरुवारी ते व आम्ही पाली येथील शाळेला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत.- भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी, बीड.