: तालुक्यातील होळ येथील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीकांत कांबळे हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी मंजूर असलेल्या रिक्तपदी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ६ ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतींपैकी होळ एक आहे. ग्रामपंचायतीकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी न केल्याने प्रादुर्भाव वाढला आहे. महिनाभरात ६ जणांना प्राण गमवावे लागले. अशा परिस्थितीतही ग्रामसेवक श्रीकांत कांबळे हे गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांच्या जागी मंजूर असलेल्या रिक्तपदी अनुभवी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, सत्यभामा राख, आश्रूबाई राख, शशिकला शिंदे, लता घुगे, मच्छिंद्र कसबे यांनी केली.
सध्याचे ग्रामसेवक हे अनुभवी नाहीत. ते कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ग्रामपंचायतीकडून कोरोनाबाधितांसाठी संस्थात्मक अलगीकरण, विलगीकरणाची सोय न करता घरी राहण्यास परवानगी देणे, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जात नाही. त्यामुळे निष्क्रिय ग्रामसेवकाची बदली व्हावी, अनुभवी ग्रामविकास अधिकारी द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही सर्वजण आंदोलन करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य तथा गटनेता योगेश शिंदे यांनी सांगितले.