लोकमत न्यूज नेटवर्क
केज : खरीप हंगामातील पेरणीच्या पूर्वी खताच्या किमतीमध्ये केंद्र सरकारने मोठी दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ केज तहसील कार्यालयासमोर बुधवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खताच्या पोत्याची प्रतीकात्मक होळी करीत आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्राच्या निर्णयाचा निषेध केला.
पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त झाला आहे. त्यात खरीप हंगामातील पेरणीच्या पूर्वीच केंद्र शासनाने रासायनिक खताच्या दरात मोठी वाढ केली आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. लॉकडाऊनमुळे शेतात पिकवलेला शेतीमाल विक्री करण्यास अडचणी येत आहेत. बाजार समित्या, बाजारपेठ बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल घेण्यास कोणी धजावत नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच केंद्र शासनाने रासायनिक खताची दरवाढ करत शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली रासायनिक खताच्या पोत्याची होळी केली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, अशोक रोडे, मंगेश देशमुख, जे. डी. देशमुख, राज तपसे, किरण पारवे आदी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार केज यांना देण्यात आले.