अंबाजोगाई : मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लॉकडाऊन झाली असून, कोरोनाच्या भीतीने पालकही मुलांना घराबाहेर पाठवत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये अनेक बदल जाणवत आहेत. विशेषतः मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.
मागीलवर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले. परिणामी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यानंतर कालांतराने कोरोना लाट जशी कमी झाली, त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढतच चालल्याने शाळा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला गेला, तर शाळेसोबत खासगी क्लासेसवालेही ऑनलाईन शिकवण्या घेत असल्याने मुलांचा बहुतांश वेळ ऑनलाईन शिक्षणातच जाऊ लागला. परिणामी वर्षभरापासून मुले घरातच कोंडली गेलेली आहेत.
मुक्तपणे मैदानावर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल व टीव्हीव्यतिरिक्त मनोरंजनासाठी दुसरे साधन शिल्लक नाही. घराबाहेर पडण्यासाठी पालकांचा मज्जाव आहे. एकाच ठिकाणी बसून मुले कंटाळली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. पालकांनाही आपल्या मुलांची चिंता सतावत आहे. आपल्या मुलांचा तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत गप्पा, गोष्टी कराव्यात. तसेच छोटे-मोठे खेळ खेळावेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शारीरिक आरोग्यावर परिणामांची भीती
कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले. मुलांना घरीच रहावे लागत आहे. टीव्ही व मोबाईलवरच वेळ घालविणे सुरू आहे. मित्र, सवंगडी भेटत नसल्याने मुलांचे मैदानी खेळ खेळणेच बंद झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी मुलांची मानसिकता समजून त्यांना वेळ द्यावा - डॉ.प्रसाद कुलकर्णी,
बाल रोगतज्ज्ञ, अंबाजोगाई.