लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विविध चार गुन्ह्यांमध्ये चोर व इतर आरोपी पकडण्यात बीड जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करणा-या १० सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी केला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करून पळून जाणाºया चोरट्यांचा पाठलाग नागरिकांनी केला. यामध्ये एक चोर विहिरीत पडला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ शिरूर पोलिसांना माहिती दिली. येथील पाच नागरिकांच्या सहकार्यामुळे एका चोराला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर परळी ग्रामीण व परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतही चार सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांना वेळीच माहिती दिली. येथेही तीन चोरांना पकडण्यात आले होते.
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराला पकडण्यात एका व्यक्तीने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या सर्वांचा मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गौरव केला. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह अधिकारी, कर्मचाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.