बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा
अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक, प्रशांत नगर, शिवाजी चौक या भागात असणा-या चहाच्या टप-यांसमोर चहा पिण्यासाठी आलेले ग्राहक आपल्या दुचाकी गाड्या बिनधास्त रस्त्यावर लावून टप-यावर चहा पीत बसतात. गाड्या रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. बेशिस्त पार्किंग, समोर असणारे हातगाडे यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.
खंडित वीज सुरळीत करण्याची मागणी
बीड : केज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून १५ दिवसांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत कृषी पंपाचे थकीत वीज बील सक्तीने वसुल केले जात आहे. अचानक कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. हा खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी उपकार्यकारी अभियंता यांना मंगळवारी दिले. यावेळी प्रमोद पांचाळ, फेरोजखान, सुग्रीव करपे आदी उपस्थित होते.
गॅस सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक
अंबाजोगाई : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते. हा प्रकार सातत्याने सुरू आहे. हे सिलिंडर प्रवास करणा-या ऑटोद्वारे इतरत्र नेऊन विकली जातात. पुरवठा विभागाने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.