बीड :
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे मानधन एप्रिल २०२१ पासून थकीत आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. मानधन मिळत नसल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आशांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे जि. प. परिसर दणाणून गेला.
अंबाजोगाई तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रतर्वकांचे मानधन नियमित होते तर इतर तालुक्यांचे मानधन चार महिने थकले जाते हा अन्याय का? या दुजाभावामुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांत रोष आहे.
‘थोडेसे माय-बापासाठी पण’ या उपक्रमाच्या अनुषंगाने वृद्ध नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम आशा स्वयंसेविकांना विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये देण्यात येत आहे. आशा स्वयंसेविकांच्या सेवा-शर्तीनुसार त्यांची सेवा कामावर आधारित मोबदल्यावर आहे. या कामासाठी आशा स्वयंसेविकांना योग्य मोबदला जाहीर केलेला नाही. शासनाच्या आदेशानुसार आशा स्वयंसेविकांना ठरवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामे त्यांना सांगावयाची असतील तर त्यांना कामे सांगणाऱ्या अधिकाऱ्याने योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. त्यानुसार वृद्ध नागरिकांचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविकांकडून करून घ्यायचे असेल तर प्रति आशा प्रति दिन ३०० रुपये मोबदला जाहीर करावा. एप्रिल महिन्यापासूनचे थकीत वेतन अदा करावे, मानधनात वाढ करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, प्रदेश कार्याध्यक्षा कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.