सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळीवेस चौकामध्ये संतोष वाळके हे उभे होते. यावेळी त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना अडवून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तीन दिवस कडक निर्बंध लावलेले आहेत. यात रुग्णालय, मेडिकल यांना सुट देण्यात आलेली आहे. बुधवारी सकाळी सद्गुरू रुग्णालयामध्ये काम करणारे चैतन्य शहाणे आणि राठोड क्लिनिकमध्ये काम करणारे विठ्ठल क्षीरसागर हे दुचाकीवरून जात असताना संतोष वाळके यांनी माळीवेस चौक येथे त्यांना अडवले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे ओळखपत्र दाखवले, तरीही त्यांना जबर मारहाण केल्याचे जखमींनी सांगितले. दरम्यान, या मारहाणीत विठ्ठल क्षीरसागर यांच्या हाताला जबर मार लागला असून, त्यात त्यांचे दोन बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. आरोग्य सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात असून, पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:36 AM