पेठ भागात इंटरनेटला अडथळा
बीड : काही दिवसांपासून बीड शहरातील पेठ, एमआयडीसी भागात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.
दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते; पण अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.
खड्डे बुजवावेत
बीड : तालुक्यातील चौसाळा गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांमधून खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी होत आहे. वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाळू चोरी वाढली
बीड : केज तालुक्यातील बेलगाव, काळेगाव परिसरातील नदीपात्रात वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असून, गावामध्ये व गावाबाहेर वाळू साठे केले जात आहेत. या वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने फावत आहे.
पेठ भागात अवैध गतिरोधकांमुळे त्रास
बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते, तसेच अपघाताचा धोका संभवतो. या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होत असली तरी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
पिकांवर आले रोगराईचे संकट
अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून दररोज ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा या पिकांना रोगराईचा फटका बसू लागला आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. वातावरणात असे बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके पिकांवर फवारावी लागतात. या औषधांचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना होतो.
तारा दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील धर्मापुरी, उजनी, पूस, आदी ग्रामीण भागात विद्युत खांब वाकले आहेत. तसेच अनेक ठिकाणी तारा सैल किंवा लोंबकळत आहेत.