गेवराई : पदवीधर निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी करून मला पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिली असून, हा तरुणांचा विजय आहे. विद्यार्थी आणि पदवीधरांच्या प्रश्नांची यापूर्वी सोडवणूक केली असून, यापुढेही प्रलंबित प्रश्न निश्चित सोडवले जातील. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील मुलींसाठी पुण्यामध्ये सर्व सोयींनी युक्त वसतिगृह सुरू करणार असल्याचे प्रतिप्रादन पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. सतीश चव्हाण यांनी केले.
येथील र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव धुमाळ, जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव जाधव, जय भवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, पाटीलबा मस्के, कुमारराव ढाकणे, अॅड. सुभाष निकम, अॅड. कमलाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, किशोर कांडेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. रजनी शिखरे यांनी केले. सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी द्यावी
पदवीधर निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण यांना गेवराई विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मतदान झाले असून, त्यांनी तालुक्याकडे काकणभर जास्त लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार संधी द्यावी. मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थिनींसाठी पुण्यात वसतिगृह सुरू करण्याची गरज आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र बीड येथे सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केली.