लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे सामान्य लोकांचा रोजगार तर हिरावलाच पण भाजी-भाकरीही बंद केली आहे. २०२० वर्ष कसेबसे काढल्यानंतर आता २०२१सुद्धा त्याच मार्गाने जात असल्याने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता हे लॉकडाऊन कधी उघडणार आणि हाताला कमी कधी मिळेल, अशी प्रतीक्षा या महिलांना लागली आहे.
रोजगार नसल्याने अनेक कुटुंबाची उपासमार होत आहे. हॉटेल व इतर अस्थापना बंद झाल्याने हाताला काम नाही. त्यामुळे याच्या त्याच्या मागे लागून कामाचा शोध हे कामगार घेत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना कोणीच काम देत नाहीत. दिले तरी जिथे ३०० रुपये रोज मिळायचे तिथे २०० रुपयेच दिले जात आहेत.
वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक
गतवर्षी लॉकडाऊन लागणार याची कसलीच अपेक्षा नव्हती. अचानक लॉकडाऊन लागले आणि सर्व काही विस्कळीत झाले. त्यामुळे वर्षभर त्रास झाला.
हाताला काम नसल्याने या महिला कामगारांना वर्षभर अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. तसेच याची त्याची उसनवारी करून वर्षभर कुटुंबाचा गाडा चालवावा लागला होता.
महिलांबरोबरच त्यांच्या पतीलाही काम नसल्याने सर्वच कुटुंब अडचणीत सापडले होते. अनेकदा जेवणाचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. २०२० नंतर आता २०२१ मध्येही तेच सुरू झाले.
आता तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे?
२०२० मध्ये अर्धा महिना संपला होता, तेवढ्यात लॉकडाऊन लागले. आज ना उद्या उघडेल असे वाटत होते, परंतु सहा महिने घरात बसावे लागले. अचानक लॉकडाऊन लागल्याने आर्थिक नियोजनही बिघडले होते. आता कसेबसे सुरू झाले होते, तर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाने तर हाल केलेच, पण आता लॉकडाऊनने त्यापेक्षाही जास्त हाल होत आहेत. हाताला रोजगार द्यावा, बस एवढेच.
- कल्पना शिंदे, कामगार महिला
मागील वर्ष कसे काढले, हे आम्हाला कोणी विचारू नये आणि आम्ही पण सांगणार नाही. कारण पुन्हा ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो. आता पुन्हा तीच वाट दिसू लागली आहे. काय करायचे तर करा, फक्त हाताला काम द्यावे, एवढीच मागणी आहे.
- अर्चना काळे, कामगार महिला
शासनाच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यातील एकही हॉटेल सुरू नाही. केवळ पार्सल सुविधा देण्यात आलेली आहे. बीड शहर व परिसरात साधारण ३५० हॉटेल आहेत. येथे कोरोनाचे नियम पाळले जातात, की नाही याची तपासणी केली जात आहे.
- अनिकेत भिसे, अन्न सुरक्षा अधिकारी, बीड