बीड : रात्रीच्या वेळी सुरू असलेले हॉटेल (खानावळ) बंद करण्यास सांगितल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.
संदीप गिराम (नेमणूक पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड) असे हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास एक हॉटेल सुरु होते. त्यादरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे व त्यांचे सहकारी गस्तीवर होते. त्यांनी हॉटेल बंद करण्याच्या सूचना संबंधित चालकाला दिल्या. त्यावेळी पोलीस कर्मचारी संदीप गिराम हॉटेलमध्ये जेवण करत होते. कर्मचाऱ्यांनी हॉटेल बंद करण्यास सांगितल्यानंतर ‘हे हॉटेल माझे आहे’ कोण बंद करतो, असे म्हणत पोलीस अधिकारी तुपे यांना शिवीगाळ केली. मात्र, तुपे यांना ही गोष्ट कर्मचाऱ्यांनी सांगितली नाही. तोपर्यंत दुसरे एक हॉटेल बंद करून त्या आल्या होत्या.
अर्ध्या तासाने गिराम जेवत असलेल्या हॉटेलवर आल्यानंतरदेखील हॉटेल उघडे दिसले. त्यानंतर इतर पोलिसांना बोलावून हॉटेल बंद केले. यावेळी पुन्हा तुपे यांच्यासमोर गिराम याने शिवीगाळ केली. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अटक करून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्नपोलीस उपाधीक्षक व इतर एका अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करू नये, यासाठी पोउपनि. तुपे यांच्यावर दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या कानावर प्रकरण गेल्यामुळे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात तपासी अधिकाऱ्याने पोलीस कोठडीची मागणी करू नये, असा सल्लादेखील दिल्यामुळेच तपासी अधिकाऱ्याने न्यायालयीन कोठडीचीच मागणी केल्याचीदेखील सूत्रांची माहिती आहे.