- नितीन कांबळेकडा (जि. बीड) : बाजारहाट, दळण, किराणा व इतर लहानसहान वस्तू आणण्यासाठी पायी जाणे शक्य नसल्याने ७० वर्षीय लहानाबाई या ‘सोनी’ नावाच्या घोडीवर बसून गावात फेरफटका मारतात. त्यांना पाहताच पोरं म्हणतात आली झाशीची राणी...कोण आहे ही झाशीची राणी हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने थेट कारखेल गाव गाठलं.
आष्टी तालुक्यातील कारखेल गावापासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पोटात राहणाऱ्या ७० वर्षीय लाहनाबाई राजाराम गव्हाणे. त्यांच्याकडे १८ एकर बागायती शेती आहे. यातून दरमहा २ लाख रुपये उत्पन्न मिळते. दोन्ही मुले बाहेरगावी असतात. घरी जित्राब, पाण्याची सोय, शेतीबाडी हे सगळं असताना त्यांनी १२ वर्षांपूर्वी पाच हजार रूपये देऊन एक घोडीचे शिंगरू खरेदी केले. तिचे नाव सोनी असे ठेवले. जित्राबासह रानावनात चारापाणी मिळायचा. हे करताना सवय लागावी म्हणून रानावनात लाहनाबाई एकट्याच घोडीवर फिरत असत.
सुरुवातीला ज्येष्ठ मंडळींसमोर घोडीवर बसत नव्हते. बघितले तर रागावतील, काही बोलतील, या भीतीने तसेच पडले तर लोक हसतील, असे वाटायचे म्हणून लाहनाबाई माणसं नसल्यावर एकटीच घोडीवर बसायच्या. आज त्या सोनी नावाच्या घोडीवर बसून थाटात सवारी करत बाजार, किराणा, दळण आदी कामांसह जनावरांची राखण करतात. आधी घोडीवर बसायला मी लाजायचे; पण सारखी धावपळ नको व दररोज गावात ये-जा करावी लागत असल्याने न लाजता घोडीवर बसून फिरू लागले. गावात येताच लोक ‘आली झाशीची राणी’ म्हणायचे. पण आता सवय झाल्याने त्याचे काही वाटत नाही, असे लाहनाबाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.