बीड : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२१ पेरणीसाठी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे, जिल्ह्यात गत खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी ३२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड झाली होती, तसेच विकतचे बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार पेरणीचे संकटदेखील आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्यावर भर द्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या लागवड क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची घरगुती पद्धतीने स्थानिक पातळीवर उगवणक्षमता चाचणी घेऊन ज्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, असे घरचे सोयाबीन बियाणे राखीव ठेवून खरीप हंगामात पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून, एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन ते तीन वर्षे वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामामधील व उन्हाळी हंगामामधील उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाण्याचा येणाऱ्या खरीप हंगामासाठी बियाणे म्हणून वापर करावा. त्यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्यासाठी असलेला खर्च वाचणार आहे.
मागणी वाढल्यामुळे दर वाढणार
सोयाबीन बियाण्याची मागणी वाढल्यामुळे दर वाढलेले आहेत. त्यामुळे घरच्या सोयाबीन बियाण्याची विक्री करू नये. कारण भविष्यात सोयाबीन बियाण्याचे दर हे सध्याच्या सोयाबीन दरापेक्षा दुप्पट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आपल्याकडील राखून ठेवलेले सोयाबीन बियाण्याची विक्री करू नये, त्याचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
७० टक्के उगवण क्षमता महत्त्वाची
घरच्या सोयाबीन बियाण्याची चाळणी करून बियाण्यातील होलपटे, काडीकचरा, माती, खडे बाजूला काढून ते स्वच्छ करून ठेवावे. साठवणुकीचे ठिकाण ओलविरहित थंड व हवेशीर असले पाहिजे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्याचा वापर करू नये. उगवण क्षमता तपासण्यासाठी एका सुतळी पोत्यात बियाणे ठेवून ते पाण्यात भिजवावे व त्याची उगवणक्षमता ७० टक्के असेल, तर त्या बियाण्याची पेरणी करावी.
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच संंबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड
(द.गो. मुळे)
-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
बीड
===Photopath===
130421\13_2_bed_12_13042021_14.jpg
===Caption===
सोयाबीन