लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लागोपाठ दुसऱ्या वर्षी शेतीच्या नुकसानीचा आम्हाला फटका बसला आहे. कर्जबाजारी झालो आहोत. गतवर्षी बोंडअळीने कापूस खाऊन टाकला तर यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे दोन्हीही हंगाम हातचे गेले. खायला अन्न नाही की प्यायला पाणी. चारा आणि पाण्याअभावी जनावरांचेही हाल होत आहेत. अशा भयाण दुष्काळात आम्ही जगायचे कसे, असे प्रश्न शेतक-यांनी पथकातील अधिका-यांसमोर उपस्थित केले.दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या पथकातील अधिका-यांनी शेतक-यांशी विविध विषयावर चर्चा केली. पिके कुठली घेता, पिण्याच्या आणि शेतीसाठी पाणी आहे का?, कुुठून आणता?, रोजगार मिळतो का?, शासकीय योजना राबविल्या जातात का?, अधिका-यांचे सहकार्य आहे का, असे अनेक प्रश्न विचारून शेतक-यांना बोलते केले.शासनाकडून निश्चितच सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी शेत-यांना दिले.जरूड येथील बागायतदार शेतकरी सखाराम शिंदे यांनी आपली व्यथा मांडली. त्यांच्या मोसंबी, लिंबू आणि आंब्याच्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत. दहा वर्षापासून ह्या बागा जोपासल्या. विमाही काढला आहे. नुकसानीच्या तुलनेत अल्पसा विमाही मिळेल. परंतु, ही मदत जर आता मिळाली तर टँकर लावून ही झाडे वाचवता येतील. माझा भविष्याचा प्रश्न मिटेल. नंतर मदत मिळून काय फायदा, माझे संपूर्ण कुटुंब आयुष्यभरासाठी रस्त्यावर येईल, अशी खंत सखाराम शिंदे यांनी व्यक्त केली.रेवली येथे सरपंच मनोहर केदार, चंद्रकांत कांदे व शेतकºयांंनी आपले प्रश्न पथकासमोर मांडले. भरीव मदत तातडीने मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.कायमस्वरूपी उपाय हवेतआम्ही दोन दिवसांपासून पाहणी करत आहोत. खरोखरच दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. आज आपल्या देशाची भिस्त शेतीवर आहे. असे प्रसंग वारंवार घडू नयेत म्हणून शेतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतक-यांना निश्चितच मदत झाली पाहिजे. आमच्याही भावना त्याच आहेत, असे ‘लोकमत’शी बोलताना पथकातील केंद्रीय कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सहसल्लागार मनीष चौधरी यांनी सांगितले.
आम्ही जगायचं कसं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:26 AM