बीड : कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive ) असल्याचे प्रमाणपत्र आणि रुग्णालयात मृत्यू होऊनदेखील मृत्यूप्रमाणपत्रावर कोरोना संशयित, न्यूमोनिया असल्याच आजार दाखवून मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले ( Negative Death Certificate Given Despite Corona Positive report) आहेत. हा सर्व प्रकार कोरोना काळात भरती झालेल्या कंत्राटी डॉक्टरांच्या दुर्लक्षाने झाल्याचे उघड झाले आहे. आता प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी नातेवाईक जिल्हा रुग्णालयात खेटे मारत आहेत. आता मृत्यू प्रमाणपत्रावरच उल्लेख नसल्यास सानुग्रह अनुदान मिळणार कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनामुळे एखादी व्यक्ती मयत झाली तर त्यांच्या निकवर्तीय नातेवाइकांना ५० हजार रुपयांचे सानुग्राह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. याचा अधिकृत शासन निर्णय शुक्रवारी आला. याचा लाभ घेण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आणि त्यावरील मृत्यूचे कारण हे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत; परंतु कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काही डॉक्टरांची भरती करण्यात आली होती. काही डॉक्टरांचे काम कौतुकास्पद आहे; परंतु काहींनी ढिसाळ कारभार केल्याचे उघड झाले होते. असेच काही प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. कोरोनाबाधित असताना मृत्यू झाल्यानंतरही मृत्यू प्रमाणपत्रावर सस्पेक्टेड व न्यूमोनिया अशी आजाराचे कारणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रमाणपत्र सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. याच्या दुरुस्तीसाठी नातेवाईक दररोज जिल्हा रुग्णालयातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात खेटे मारत आहेत; परंतु डॉक्टर येऊन प्रमाणपत्राची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आजही नातेवाइकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत.
ही घ्या उदाहरणे :१ = मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील; परंतु सध्या बीडमध्ये नोकरी करत असलेल्या एका युवकाने आपल्या वडिलांना औरंगाबादहून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. याच रुग्णाची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी डॉ. सुरेश साबळे यांनी केली होती; परंतु त्यानंतर आठवड्यात या रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर त्यांना कोरोना सस्पेक्टेड असे लिहून प्रमाणपत्र दिले. त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार खेटे मारले. संबंधित महिला डॉक्टरला विनंती केली. तरीही दीड महिना काहीच झाले नाही. वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर यात दुरुस्ती झाली.
२ = वडवणी तालुक्यातील भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष उत्तरेश्वर खताळ व मोरवडचे सरपंच लंबाटे यांच्या ओळखीच्या महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांच्या प्रमाणपत्रावर न्यूमोनिया असे लिहिण्यात आले. त्याच्या दुरुस्तीसाठी हे दोघे महिन्यापासून खेटे मारत आहेत. अद्यापही यात दुरुस्ती झालेली नाही. नातेवाइकांनी कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाणपत्रही दाखविले. तरीही केवळ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने त्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही.
दुरुस्ती केली जाईल कोरोना पॉझिटिव्ह असताना मृत्यू झालेला असेल आणि कोरोना सस्पेक्टेड अथवा इतर आजार लिहिलेला असेल तर त्यात दुरुस्ती केली जाईल. नातेवाइकांनी पॉझिटिव्ह असलेले प्रमाणपत्र दाखवावे. संबंधित कंत्राटी डॉक्टर नाही आले, तरी एका तज्ज्ञ डॉक्टरकडून मृत्यू प्रमाणपत्र वितरित केले जाईल. नातेवाइकांनी मी अथवा एसीएस यांच्याकडे अर्ज करावा.-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड