बीड : शहरातील साठे चौकात दोन दिवसांपूर्वी दिलेली वीज जोडणी कुठलेही कागदपत्र आणि लेखी आदेश नसताना तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण अधिकार्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलेच तोंंडावर पडले. यामध्ये मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे एका जोडणीत लाईनमन ते उर्जामंत्र्यांपर्यंत जीव अडकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात नवगण कॉम्पलेक्समध्ये स्व. सोनाजीराव क्षीरसागर यांच्या मालकीची जागा आहे. याच जागेतील विद्युत कनेक्शन बंद करण्यासंदर्भात आ.जयदत्त क्षीरसागर यांनी अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांना पत्र दिले होते. त्यानंतर पूर्ण कागदपत्रांसह वारसाहक्क दाखवत संदीप क्षीरसागर व उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी पुन्हा वीज जोडणी देण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उपअभियंता एस.एन.भारंबे यांना मुख्य अभियंता लातूर आणि अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी लेखी आदेश न देता तोंडी सांगत वीज कनेक्शन तोडण्यास सांगितले.
एवढ्यात हेमंत व संदीप क्षीरसागर यांनी याला विरोध करीत वीज तोडणीचे कारण विचारले. परंतु एकही कागद हाती नसताना कारवाईस आलेले भारंबे तोंडावर पडले. त्यांना येथून रिकाम्या हाताने परतावे लागले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी याठिकाणी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तसेच दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण केले होते. परंतु केवळ महावितरणच्या अज्ञानामुळे पोलीस अधिकारी, कर्मचार्यांची चांगलीच धावपळ उडाली. महावितरणने पोलिसांची थट्टाच मांडल्याची चर्चाही येथे ऐकावयास मिळाली.
काय दडलंय या वीज जोडणीत?काका-पुतण्याचा वाद महावितरण कार्यालयात पोहचला आहे. अधीक्षक अभियंत्यांना रविंद्र क्षीरसागर यांना वीज जोडणी न देण्यास उर्जामंत्र्यांकडून दबाव होता, असे समजते. तर गुरूवारी मुख्य अभियंत्यांनीही यामध्ये लक्ष घालत वीज तोडणीचे तोंडी आदेश दिले. वीज जोडा आणि तोडा हा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या वादात महावितरण पडले आहे.