लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरघाट : काळेगाव घाट (ता. केज) येथील शेतकरी सतीश कोठावळे यांनी स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या केज शाखेविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. काळेगाव घाट येथील शेतकऱ्यांनी स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या केज शाखेत खरीप हंगामातील पीक कर्जासाठी जून महिन्यात अर्ज केले होते. परंतु, डिसेंबर महिना संपत आला तरीही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळालेले नाहीत, असे तक्रारीत म्हटले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. आज मात्र शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे एकीकडे खासगी सावकारांचे व्याज चालू आहे तर दुसरीकडे बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. बँकेला वेळोवेळी अर्ज, विनंत्या करूनही बँकेने त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून शेतकरी सतीश कोठावळे यांनी थेट राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने केवळ दोन दिवसात काेठावळे यांच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने याबाबत स्टेट बॅंक आॅफ इंडियाचे चेअरमन, राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव, बीड जिल्हाधिकारी कार्यालय यांनाही अवगत केले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले आहे. तसेच भविष्यात यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा आंदोलन झाल्यास होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी बॅंक जबाबदार असेल, असा इशारा शेतकरी सतीश कोठावळे यांनी बँक प्रशासनाला दिला आहे.