अंबाजोगाई (बीड ) : न्यायालयात दाखल केलेला खटला विवाहिता मागे घेत नसल्याने पती, सवत, सासू, सासऱ्याने तिला बळजबरीने विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे सोमवारी दुपारी घडली.
शालुबाई पंडित राठोड (वय २५) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिचा सासरच्या व्यक्तीविरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. हा खटला मागे घ्यावा यासाठी तिच्या सासरच्या लोकांनी तगादा लावला होता. परंतु शालूबाई ऐकत नसल्याने चिडलेला पती पंडित मोतीराम राठोड, सवत शशीबाई, सासरा मोतीराम खुबा राठोड आणि सासू केशरबाई यांनी कुसळवाडी तांडा क्र. १ येथे शालूबाईच्या माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर सवत, सासू-सासरे यांनी तिचे हातपाय दाबून धरले आणि पतीने तिला विषारी औषध पाजले असे शालूबाईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये बर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत. दरम्यान, विषबाधा झालेल्या शालूबाईवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.