बीड : घरासमोर थांबून शिवीगाळ करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीवर १३ जणांनी तलवार, चाकू आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी पतीला वाचविण्यासाठी धावत आलेल्या पत्नीवरही हल्लेखोरांनी चाकूने वार केले. ही घटना बीड शहरातील एकता नगर भागात बुधवारी रात्री घडली.
संतोष रमेश जाधव ( रा. एकता नगर, बीड) असे हल्ल्यातील जखमी व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजता ते घरी असताना घराबाहेर मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून डोकावले असता भैय्या साळवे, सौरभ साळवे, सचिन साळवे, आकाश कोकाटे, भरत कांबळे, अशोक वाघमारे, अजय राठोड, अनिल वीर आणि अनोळखी पाच जण कोणालातरी फोनवरून शिवीगाळ करत असल्याचे दिसले. घरात महिला असल्याने तिथे थांबून शिवीगाळ करण्यास जाधव यांनी मज्जाव केला. तेंव्हा त्यांनी जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर घराबाहेर आलेल्या संतोष जाधव यांच्यावर त्यांनी तलवार, चाकू, दगड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात तलवारीचा डोक्यावरील वार अडविताना जाधव यांच्या हाताला गंभीर जखम झाली. संतोष यांचा आरडाओरडा ऐकून पत्नी उषा यांनी त्यास वाचविण्यासाठी धाव घेतली असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील चाकूने वार करून जखमी केले. जाधव दांपत्याचा आरडाओरडाऐकून नातेवाईक आणि गल्लीतील इतर लोक धावून येत असल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले. जखमी संतोष जाधव यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्यांच्या जबाबावरून सर्व १३ हल्लेखोरांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि जमदाडे हे करत आहेत.
चौकट,
पेठबीड पोलिसांचा वचक नाही
शहरातील पेठ बीड भागात टवाळखोरांचा त्रास मागील काही दिवसांपासून वाढलेला आहे. त्यामुळे त्यापरिसरात राहणाऱ्या व्यापारी तसेच सर्वसामान्य नागिरकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पेठ बीड पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असून, अशा टवाळखोरांवर पोलिसांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. तर, पोलीस अधीक्षकांनी याची नोंद घेऊन ठाणेप्रमुखांना जाबाबदारीची जाणीव करून द्यावी अशी मागणी रहिवाश्यांमधून केली जात आहे.