केज : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असल्याने तसेच अनुकंपा तत्त्वावर मुलाला नोकरीला लावण्यासाठी पतीचा सिनेस्टाइल काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार मांगवडगाव (ता. केज) येथे ११ रोजी समोर आला. मांगवडगाव शिवारात तीन महिन्यांपूर्वी विहिरीत एसटी बसचालकाचा मृतदेह आढळून आला होता. न्यायालयीन आदेशावरून पत्नी, प्रियकर व मुलावर खुनाचा गुन्हा नोंद झाला.
भीमराव रंगनाथ खराटे (५२, रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. २९ मे २०२१ रोजी मांगवडगाव (ता. केज) शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे दिला. या प्रकरणात तेव्हा युसूफवडगाव ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, मयत भीमरावचे बंधू बालाजी रंगनाथ खराटे यांना पत्नी, तिच्या प्रियकरावर व मुलावर संशय होता. त्यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. केज येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ रोजी रात्री बालाजी रंगनाथ खराटे यांच्या तक्रारीवरून मयत भीमरावची पत्नी राधाबाई भीमराव खराटे (४८), प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे (४०) व मुलगा सिध्देश्वर भीमराव खराटे (२८, सर्व रा. भोगजी ता.कळंब) यांच्याविरुध्द युसूफवडगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला. आरोपी फरार असून तपास सहायक निरीक्षक विजय आटोळे करत आहेत.
....
प्रेमात अडथळा, मुलाच्या नोकरीसाठी...
राधाबाई खराटे व महादेव ऊर्फ बबन खराटे यांच्यात प्रेमसंंबंध होते. मात्र, यात पती भीमराव याचा अडथळा ठरत होता. शिवाय त्याला संपविल्यानंतर एसटी महामंडळातील सेवा कालावधीचे पैसे मिळतील तसेच मुलगा सिध्देश्वर यास अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लावता येईल, यामुळे खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे. राधाबाई व महादेवने रचलेल्या भीमरावच्या खुनाच्या कटात सिध्देश्वरलाही सामावून घेतले.
....
हत्या करुन आत्महत्येचा बनाव
राधाबाई खराटे व महादेव यांनी भीमरावचा कट रचून खून केला. त्यास विहिरीत बुडवून मारल्यानंतर आत्महत्या भासविली. मात्र, कोल्ड ब्लडेड मर्डरचा हा थरार अखेर उघडकीस आला. या घटनेने कळंबसह केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
...