बीड : चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणत नाही, म्हणून विवाहितेचा छळ करून अंगावर रॉकेल ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पती, सासू, सासऱ्याला दोषी ठरवून, दोन वर्षे सक्त कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा येथील अपर सत्र न्या.(पहिले) यू.टी. पौळ यांच्या न्यायालयाने शनिवारी सुनावली.
उंबरमुळी (ता.शिरुर) येथील वैशाली हिचा ११ जून, २०१५ रोजी घाटशीळ पारगाव येथील विकास बाबासाहेब खेडकर याच्याशी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. लग्नानंतर सहा महिन्यांनी पती विकास व सासू-सासऱ्यांनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत, वैशालीचा छळ सुरू केला. अशातच २० एप्रिल, २०१७ रोजी सकाळी साडेदहा वाजता तिला पती व सासू-सासऱ्यांनी पैशांच्या कारणावरून लाथाबुक्क्याने मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शिवीगाळ करत रॉकेल अंगावर ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वैशाली विकास खेडकरच्या फिर्यादीवरून पती व सासू-सासऱ्यावर शिरूर पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा नोंद झाला. तत्कालीन उपअधीक्षक एम.आर.काझी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अपर सत्र न्या.(पहिले) यू.टी. पौळ यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने कलम ४९८ (अ) भादंविमध्ये दोषी ठरवून पती विकास बाबासाहेब खेडकर, सासरा बाबासाहेब यशवंत खेडकर, सासू सुनीता बाबासाहेब खेडकर यांना दोषी ठरवून दोन वर्षे सक्त कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी काम पाहिले. हवालदार शिवाजी डोंगरे यांनी पैरवी म्हणून त्यांना साहाय्य केले.
......
९ साक्षीदार तपासले
या प्रकरणात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीपुरावे, तिच्या अंगावर आढळलेले ओरखडे ग्राह्य धरून तिचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे सिद्ध झाल्याने आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचले.