सोमनाथ खताळ, बीड: पती दारूडा असल्याने लग्नानंतर अवघ्या सातच महिन्यात संसार मोडल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. पतीला व्यावसाय करण्यासाठी विवाहितेला माहेरहून ३ लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह सारच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील तरूणीचा २२ मे २०२२ रोजी पाटोदा येथील तरूणासोबत विवाह झाला होता. यावेळी तरूणीच्या माहेरकडील लोकांनी लग्नात चार लाख रूपये खर्च करून नवरदेवाला पाच ग्रॅमची अंगठीही घातली. त्यानंतर सुरूवातीचे सहा महिने विवाहितेला सुखाने नांदवले. नंतर तिला पती दारूडा आणि त्याला कसलीही नौकरी नसल्याचे समजले. तो दारू पिऊन पत्नीला मारहाण करू लागला. हा प्रकार विवाहितेने सासरच्यांना सांगितला. परंतू त्यांनीही उलट विवाहितेलाच त्रास दिला. तुझ्या पतीला खासगी व्यावसाय करण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये घेऊन ये असे म्हणत २४ डिसेंबर २०२२ रोजी विवाहितेला मारहाण करत घराबाहेर काढण्यात आली. त्यानंतर अनेकवेळा सासरच्यांची समजूत काढली परंतू त्यांनी विवाहितेला नांदविण्यास नकार दिला. अखेर तिने बीडचे शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून पतीसह सासू, सासरे, दीर, मेव्हणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"