बीड : आमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत... तुम्ही सर्व जण भ्रष्टाचारी आहात... मी बीडचा डॉन आहे... मी चांगल्या चांगल्याला खेटलो आहे... मी बीडचा दादा आहे... तुम्ही मला कसे ओळखत नाही... तुम्ही पोलीस माझे काहीच करू शकत नाही... असे म्हणत तर्र नशेत एका गुंडाने पोलीस ठाण्यात धुडगूस घातला. यावेळी त्याने संगणकाची तोडफोड करून अर्वाच्य शिवीगाळ करत हवालदारास धक्काबुक्की करून पोबारा केला. शहरातील पेठ बीड ठाण्यात १३ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता हा थरारक प्रकार घडला. या घटनेनंतर दहा तासांनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
बाबासाहेब ऊर्फ भिंगऱ्या पांडुरंग जोगदंड, असे त्या आरोपीचे नाव आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता तो पोलीस ठाण्यात आला. ठाणे अंमलदारांच्या कक्षात त्याने मिशांवर पीळ देतच प्रवेश केला. ठाणे अंमलदार पी.के. ससाणे यांनी त्यास काय काम आहे, असे विचारले तेव्हा त्याने आमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत... तुम्ही सर्व जण भ्रष्टाचारी आहात... मी बीडचा डॉन आहे... मी चांगल्या चांगल्याला खेटलो आहे... मी बीडचा दादा आहे... तुम्ही मला कसे ओळखत नाही... तुम्ही पोलीस माझे काहीच करू शकत नाही... असे म्हणत पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ सुरू केली. यावेळी अंमलदार ससाणे यांच्यासह सीसीटीएनएस मदतनीस व वायरलेस विभागाचे अंमलदार होते, त्यांनाही त्याने शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान, त्यास पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अंमलदार पी.के. ससाणे यांचे गचुरे पकडले. गळ्याला नखाने ओरखडा घेऊन दुखापत केली. या झटापटीत ससाणे यांच्या शर्टचे दोन बटन तुटले. सीसीटीव्ही फुटेजचे मॉनिटर असलेले संगणक तोडल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी ससाणे यांच्या तक्रारीवरून पेठ बीड ठाण्यात शासकीय कामात अडथळा व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.
....
दहा तासांनंतर बेड्या
बाबासाहेब ऊर्फ भिंगऱ्या जोगदंड याने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून पोबारा केला. सकाळची वेळ असल्याने ठाण्यात मोजकेच अंमलदार होते. त्यामुळे तो ठाण्यातून निसटण्यात यशस्वी झाला. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी ठाण्यात धाव घेतली. गुन्हा नोंद झाल्यानंतर तो पोलिसांना लवकर सापडला नाही. सहायक निरीक्षक सुभाष दासरवाड व सहकाऱ्यांनी दहा तासांनंतर त्याच्या घरातून मुसक्या आवळल्या.
....
कोण आहे हा भिंगऱ्या
बाबासाहेब ऊर्फ भिंगऱ्या पांडुरंग जोगदंड, असे त्या गुंडाचे नाव आहे.
शहरातील पेठ बीड भागातील नागोबागल्लीत तो राहतो. त्याच्यावर मारामारी, हल्ल्याचे गुन्हे नोंद आहेत. पेठ बीड ठाणे हद्दीतील कुख्यात गुंडांपैकी तो एक आहे. धष्टपुष्ट शरीर व दहशतीच्या जोरावर त्याने गुन्हेगारी वर्तुळात बस्तान बसविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
....
पेठ बीड ठाण्यात धुडगूस घालणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. सबळ पुराव्यानिशी तातडीने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल. गुंडांवर जरब बसण्यासाठी त्याला शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. अशा प्रकारची गुंडगिरी पोलीस कदापि खपवून घेणार नाहीत.
-संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड
....
प्रश्न रस्त्याचा, आला ठाण्यात
आरोपी भिंगऱ्या हा गांजा व दारूची नशा करण्याच्या सवयीचा आहे. नशेतच त्याने ठाण्यात एन्ट्री केली. विशेष म्हणजे गल्लीतील रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या घेऊन तो ठाण्यात आला होता.